मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; 21 दिवसात रुग्णसंख्या निम्यावर
![Great relief! The death toll after three months is in the thousands; 46 thousand 148 patients in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/1800x1200_coronavirus_1-1-1.jpg)
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यभर तसेच कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत असल्याचं चित्र होतं. त्यामुळे राज्यात कडक लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी केल्यानं आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतील 4 तारखेपासून ते आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहिर केली आहे. 4 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 11,163 वर होती. तर 21 दिवसांनंतर म्हणजेच 25 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची 5542 संख्या इतकी आहे. ही रूग्णसंख्या आता अर्ध्यावर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 5542 वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची लाट ओसरत असल्याचे दिसत आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांची संख्या ही 12000 पर्यंत वाढत गेली होती. 15 तारखेनंतर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अनेक ठिकाणी गर्दी कमी करण्यात आली. मुंबईतील बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी ही कमी होत गेली. या कडक निर्बंधाचा फायदा मुंबईकरांना होताना दिसत आहे.
दरम्यान, राज्यात 66, 191 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 832 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे. राज्यात 42,36,825 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 29,966 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 6,98,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.