एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर; टाटा समूहाने घेतला मोठा निर्णय
![Good news for Air India employees; The Tata Group took a big decision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/air-india-2.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
कोरोना काळात एअर इंडिया डबघाईला आली होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. मात्र आता एअर इंडियाचा कारभार टाटा समूहाच्या हाती गेल्याने कर्मचाऱ्यांची पगार कपात रद्द करण्यात येणार असून पगारवाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचे पायलट, क्रू मेंबर्सचा आनंद द्विगुणीत करणारा हा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.
पायलट आणि क्रू मेंबर्सच्या पगारात, उड्डाण आणि लेओव्हर भत्त्यात लॉकडाऊन काळात कपात करण्यात आली होती. ही कपात लवकरच परत केली जाणार असून या कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी एअर इंडियाचे नवे मालक अर्थात टाटा समूहाने पगार आणि भत्त्याच्या पूनर्रचनेअंतर्गत त्यांच्या तीन विमान कंपन्यांच्या पायलट आणि क्रु मेंबर्सचे पगार पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
तसेच एअर इंडिया कंपनी सध्या कर्मचाऱ्यांसाठी भत्ते, रजा धोरण आणि इतर उपाययोजनांवर विचार करत आहे. पगार आणि भत्ते पुनर्स्थापित करणे अद्याप लागू झाले नसल्याचं एअर इंडियाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.