ठाकरे गटाला मोठा धक्का : खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर स्वाक्षरी करणारे ‘भाऊसाहेब चौधरी’ शिंदे गटात
![eat Big blow to Raut and Thackeray group: 'Bhausaheb Chaudhary', who signed MP Sanjay Raut's bail, joins Shinde group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Chuadhari-720x470.jpeg)
मुंबई ः
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर स्वाक्षरी करणारे भाऊसाहेब चौधरी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करताना सर्वानाच मोठा धक्का दिला. संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थनी जाऊन पक्षप्रवेश केल्याने ठाकरे गटाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच भाऊसाहेब चौधरी यांनी संजय राऊत यांचा जामीनदार म्हणून कोर्टात स्वाक्षरी केली होती, मात्र, त्याच्या आताच्या बदललेल्या भूमिकेने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.
भाऊसाहेब चौधरी हे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे नेते समजले जातात. कोर्ट कचेरी कामकाजात ते नेहमीच संजय राऊत यांना पाठबळ देण्याचे काम करत होते. त्यामुळे ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जात होते. मात्र, त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
‘महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अपेक्षित असलेली कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यावर मात्र गेल्या पाच महिन्यात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेले या निर्णयामुळे प्रभावित झाल्यामुळेच आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार झालो’ असे मत भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
भाऊसाहेब चौधरी यांनी विभागप्रमुख पदापासून ते डोंबिवली शहरप्रमुख आणि त्यानंतर नाशिक संपर्कप्रमुख अशी पदे भूषवली आहेत. चौधरी यांच्या प्रवेशावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, ठाणे जिल्हाप्रमुख आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे देखील उपस्थित होते.