TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

सेवा पंधरवडय़ात ३४ हजार जात प्रमाणपत्रांचे वाटप

मुंबई : राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा जन्मदिवस ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत आयोजित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रमात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने आघाडी घेतली आहे. या कालावधीत सहा हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करून सुमारे तीन लाख नागरिकांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले असून, त्यात ३४ हजार विद्यार्थ्यांना जातवैधता व  जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मंत्रालयात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या सेवा पंधरवडा उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव (वित्त व सुधारणा) राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अवर सचिव अनिल अहिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कर्तव्यपथ’ या उपक्रमांतर्गत राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहा हजारांहून अधिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून पाच लाखांहून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला, तर त्यातील तीन लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत राज्यात ५१९ ठिकाणी आयोजित जातवैधता प्रमाणपत्र जनजागृती शिबिरात १६०० महाविद्यालयांतील ७९ हजार पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात १७ हजार २८२ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रे व १७ हजार विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्रे देण्यासाठी ४५ ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यात ४६४ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व ओळखपत्रे देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button