दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला ट्विस्ट : मिलिंद सोमणची एन्ट्री
वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि पैशाच्या चणचणीमुळे दिशा तणावात !

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला ट्विस्ट मिळत आहे. या प्रकरणी आता अभिनेता मिलिंद सोमण यांची एंट्री झाली असून त्यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला आहे. दरम्यान, दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि पैशाची चणचण यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती, असा पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या ‘क्लोजर रिपोर्ट’ बद्दल संशय व्यक्त करून मंत्री नितेश राणे आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
दररोज नवनवीन खुलासे समोर..
बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली आहे.
दिशा मृत्यूप्रकरणी मोठी ‘अपडेट’ !
मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला होता. या रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत. पोलिसांकडून दोन सेलिब्रेटींचा जबाब नोंदवला गेला होता.
दिशा पटणीमुळे सालियन तणावग्रस्त
दिशा सालियन काम करत असलेल्या ‘कॉर्नरस्टोन कंपनी’ च्या जाहिरातीशी थेट संबंध असलेल्या अभिनेता मिलिंद सोमण आणि दिशा पटणी यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता, हे महत्त्वाचे आहे. दिशा पटणी आणि मिलिंद सोमण यांनी ‘कॉर्नरस्टोन’ या कंपनीशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींशी संवाद ठेवण्याची आणि चर्चा करण्याची जबाबदारी दिशा सालियनवर होती. करारातील गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटणीने नकार दिल्याने दिशा सालियन तणावामध्ये होती, असे आता स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – ‘.. तरच भावी पिढी सुदृढ, निरोगी होईल’; ले. कर्नल विनीत नारायण
मिलिंद सोमण काय म्हणाले?
मिलिंद सोमणने एका मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. त्यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला होता. करार संपुष्टात आल्याने मी केलेले ट्विट डिलीट करणार नाही, अशी भूमिका सोमण यांनी घेतली होती. कॉर्नरस्टोन कंपनीशी सबंधित या दोन बाबींमुळे दिशा मात्र तणावात होती, हेही एक कारण सांगण्यात आले आहे.
‘क्लोजर रिपोर्ट’ मध्ये आत्महत्याच!
पोलिसांच्या ‘क्लोजर रिपोर्ट’ मध्ये दिशाने आत्महत्याच केल्याचे नमूद करत ती कोणत्या कारणास्तव तणावात होती, हे स्पष्ट केले आहे. वडिलांच्या प्रेमसंबंधाबद्दलची माहिती, कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे व्यवहार करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त आणि तणावाखाली होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याचा ‘क्लोजर रिपोर्ट’ मध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.
नितेश राणे, संजय निरुपम यांच्या मते सगळेच संशयास्पद!
या ‘क्लोजर रिपोर्ट’वर मंत्री नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचेनेते संजय निरुपम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. संजय निरुपम यांनी या प्रकरणातील मालवणी पोलिसांचा ‘क्लोजर रिपोर्ट’ संशयास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मुलगा आदित्य ठाकरे याचे नाव याप्रकरणात आले होते. त्यामुळे या चौकशीवर राजकीय दबाव असू शकतो. निरुपम यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, मालवणी पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काहीतरी चौकशी करून निष्कर्ष काढला असावा. दरम्यान, पोलिसांच्या ‘क्लोजर रिपोर्ट’ मध्ये काहीही अर्थ नाही. दिशा सालियन हिच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही आणि या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, यासाठी नव्याने सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पूर्वी देशाचे वकील आणि वडील दोघेही तणावाखाली होते, त्यांनीच आता न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळे तपास हा नि:पक्षपाती व्हावा, असे ते म्हणाले.