देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरू, सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
![Devendra Fadnavis's interrogation started, police escorted him outside Sagar bungalow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/devendra-fadnavis-and-eknath-khadse-e1647159224745.jpg)
मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यात मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. या चौकशीवरून भाजपने निषेध नोंदवला असून सागर बंगल्याबाहेर अनेक आमदार आणि कार्यकर्तेही जमा झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढला आहे.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. याप्रकरणी आता त्यांच्याचविरोधात मुंबईतील साबयर विभागात गुन्हा दाखल झाला. बदल्यांप्रकरणात गोपनीय माहिती बाहेर आल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली असून आज त्यांची चौकशी केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिसांच्या बदल्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील माहिती त्यांनी केंद्रीय गृह सचिवांना दिली आहे. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. मात्र, बदल्यांसंदर्भातील गोपनीय माहिती बाहेर आल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.