निलंबित उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला
![Crime Branch recorded the statement of suspended Deputy Commissioner Saurabh Tripathi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/saurabh-tripathi-1-780x470.jpg)
अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याचा आरोप असलेले पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचा जबाब बुधवारी नोंदवण्यात आला. दरम्यान, त्यांचा जबाब गुन्हे गुप्तवार्ता कक्षात (सीआययू) नोंदवण्यात आला नाही. जबाब नोंदविण्यात आलेल्या ठिकाणाबाबत मुंबई पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. त्रिपाठी यांच्याविरोधात लवकरच विभागीय चौकशी सुरू करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचा त्रिपाठी यांच्यावर आरोप आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर त्रिपाठी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खंडणीप्रकरणी आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध दोन वेळा आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्रिपाठी यांनी अंगडिया व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपये प्रति महिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती. त्रिपाठी यांच्या सूचनेवरून लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यात अंगडिया व्यवसायिकांना डांबून ठेऊन त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अंगडियांकडून १९ लाख रुपये घेण्यात आले होते.
त्यातील दीड लाख रुपये त्रिपाठी यांना हवालामार्फत पाठवल्याचा आरोप आहे. ती रक्कम स्वीकारल्याप्रकरणी त्रिपाठी यांच्या नोकरालाही अटक झाली होती. या गुन्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) दिलीप सावंत स्वतः तक्रारदार आहेत. त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उपायुक्त त्रिपाठी यांनी पैसे मागितल्याबाबत अंगडिया व्यावसायिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तावार्ता पथकाकडे (सीआययू) वर्ग करण्यात आला होता. अंगडिया व्यावसायिक संघटनेचे योगेश गांधी, जतीन शहा, मधूसुदन रावल व मगनभाई प्रजापती यांनी ७ डिसेंबर, २०२१ रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेतली व याप्रकरणी तक्रार केली होती.