विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ३६ जणांविरुद्ध गुन्हा
![Crime against 36 persons driving in opposite direction](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/nm-3-traffic.jpg)
मुंबई | विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिल्यानंतर सोमवारी २६ वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विलेपार्ले येथे विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या महिला चालकाने पोलिसालाच मारहाण केल्याचा प्रकार घडला.
विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांवर आता बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी (रॅश ड्रायिव्हग) गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पांडे यांनी रविवारी दिली होती. तसेच विरुद्ध दिशेन गाडी चालवू नये, असे आवाहनही यावेळी पांडे यांनी केले होते. सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमवारी दिवसभरात ३६ चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
विलेपार्ले पूर्व येथील वि. स. खांडेकर मार्गावरील रामकृष्ण हॉटेलसमोर पोलीस शिपाई प्रशांत कोळी (३१) तैनात होते. तेथील मार्गिकेवरून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांना ते थांबण्यास सांगत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणाऱ्या नम्रता शिंगाला (३७) या महिलेला कोळी यांनी थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी महिलेने कोळी यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना मारहाणही केली. याप्रकरणी कोळी यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी, बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी शिंगाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिंगाला यांना अटक करण्यात आली आहे. शिंगाला या अंधेरी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त पांडे यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक जाहीर करून नागरिकांना त्यावर सूचना करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्यांमुळे आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली होती. त्यानंतर पांडे यांनी रविवारी विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
२२६ बेवारस वाहने हटवली
रस्त्यावर वर्षांनुवर्ष उभ्या करण्यात येणाऱ्या बेवारस वाहनांवरही कारवाई करण्याचे संकेत पांडे यांनी दिले होते. त्यानुसार सोमवारी २२६ बेवारस वाहने पोलिसांनी हटवली. जप्त वाहनांच्या नोंदणीची पडताळणी करुन संबंधित मालकांशी संपर्क साधण्यात येतो. त्यानंतरही कोणी उपस्थित राहिले नाही. तर नियमाप्रमाणे महापालिकेच्या मदतीने वाहनांचा लिलाव करण्यात येतो.