#CoronoVirus:मुंबई आयुक्तपदाची सुत्रे हातात घेताच इकबाल सिंग चहल अॅक्टिव्ह मोडमध्ये
![Mumbai Mayor is not possible without congress says ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Mumbai-BMC.jpg)
मुंबई : आयुक्तपदाची सुत्रे हातात घेताच इकबाल सिंग चहल अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसून आले. मुंबई महापालिका आयुक्त पदाची सुत्रं शुक्रवारी सायंकाळी स्वीकारली. त्यानंतर आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय आणि धारावी परिसर या दोन्ही ठिकाणी आज भेटी देऊन कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. स्वसंरक्षण वेश परिधान करुन थेट अतिदक्षता कक्षात रुग्णांची विचारपूस करतानाच कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क करा, असा सल्ला रुग्ण, डॉक्टर्स, निम्न-वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही देऊन आयुक्तांनी साऱ्यांचे मनोबल वाढवले.
तसेच अधिकाधिक नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नवनियुक्त आयुक्त चहल यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर, अतिरिक्त महापालिका आयुक्त, उप आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांनी प्रामुख्याने कोरोना संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. आज सकाळी महापालिका मुख्यालयातून आयुक्त चहल हे बाई यमुनाबाई नायर धर्मादाय रुग्णालयात पोहोचले. यावेळी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
अतिदक्षता कक्षामध्ये प्रत्यक्ष कोरोना बाधितांपर्यंत जाऊन वैयक्तिकरित्या विचारपूस केली. रुग्णालयाकडून मिळणारे उपचार, प्रकृतीत झालेली सुधारणा, औषधे व अन्नपुरवठा या संदर्भात रुग्णांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. कोरोना बाधेसह इतरही आजार असलेल्या रुग्णांना धीर देत आयुक्तांनी कुठल्या सुधारणांची आवश्यकता आहे, हेदेखील विचारले. रुग्णालयातील परिचारिका, निम्न-वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांची देखील कर्तव्ये जाणून घेत कोणत्या सुविधांची आवश्यकता असल्यास अथवा अडचणी असल्यास प्रशासनाला ताबडतोब कळवावे, असे सांगून त्यांचेही मनोबल वाढविले.