#CoronaVirus | मुंबईत अडीच लाख लिटर औषधी द्रव्यांची फवारणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/BMC.jpg)
मुंबई | मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्निशमन दलानेही मुंबईतील प्रत्येक वस्तीत जाऊन प्रचंड काम केले आहे. अग्निशमन दलाने गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील ज्या इमारतीत करोना रुग्ण आढळून आले आहेत, अशा सोसायटींमध्ये सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाची फवारणी केली आहे.
अग्निशमन दलाने महिन्याभरात ३ हजार ६३ ठिकाणी, तब्बल २ लाख ४७ हजार लिटर औषध फवारणी केली आहे. तसेच ज्या रुग्णालयांमध्ये ‘कोरोना कोविड १९’चे रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी दाखल आहेत, अशा रुग्णालयांमध्ये अग्निशमन दलाकडून एक दिवसाआड नियमितपणे फवारणी करण्यात येत आहे. मुंबईत ‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य रोगाच्या प्रसारास आळा घालण्यासाठी पालिका अधिकाधिक प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही सातत्याने करीत आहे.
याच कार्यवाही अंतर्गत मुंबई अग्निशमन दलाद्वारे ‘सोडियम हायपोक्लोराइट’ च्या द्रावणाची फवारणी करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या ३२ पथकांद्वारे ही फवारणी करण्यात येत असून या ३२ पथकांमध्ये एकूण १६० जवानांचा समावेश आहे. या फवारणीसाठी मुंबई अग्निशमन दलाची १७ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल, ९ मिस्ट फ्लोइंग मशीन आणि ६ बूम मिस्ट मशीन प्रामुख्याने वापरण्यात येत आहेत.