आठवडाभर राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता ; राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय
![Chance of heavy rain across the state for a week; Monsoon rains are active again in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/rain-3-2.jpg)
मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांमधील उघडीपीनंतर बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे १४ सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, येत्या तीन दिवसांत गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकणात, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विशेषत: जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागातदेखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, परतीच्या पावसासाठीची सुरुवात झाल्याचे अनुकूल वातावरणीय वेध सध्या स्थिरवल्यासारखे जाणवतात. त्यामुळे माघारी फिरणारा मोसमी पाऊस कदाचित वेळ घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुलाबा, सीएसएमटी, भायखळा, मलबार हिल या भागांत मुसळधार पाऊस पडला. या भागात १० मि.मी. ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक सरी बरसल्या.
सतर्क राहण्याचे आवाहन : गणेश विसर्जनाच्या (अनंत चतुर्दशी) दिवशी राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे, असा इशारा हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिला आहे. या कालावधीत सतर्क राहावे, असेही हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.