वसंत मोरेंकडून मनसेला मोठं खिंडार, मनसेचे १७ शाखाध्यक्ष ठाकरे गटात प्रवेश करणार

पुणे | वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीला रामराम केला. त्याआधी त्यांनी मनसेला रामराम केला होता. आता ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वसंत मोरेंनी शिवसेनेत जाण्यापूर्वी मनसेला खिंडार पाडलं आहे. कारण त्यांच्यासह मनसेचे १७ शाखाध्यक्ष, पाच उपविभाग अध्यक्ष, एक शहाराध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी तसंच वाहतूक सेनेचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
वसंत मोरे म्हणाले, मी कुणालाही सक्ती केलेली नाही. पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला सांगतो आहे की ज्यांना पक्षा राहायचं आहे ते राहू शकतात. मात्र जे काही राजकारण सुरु होतं ते लोकांनी पाहिलं आहे. मी कुणालाही जबरदस्ती केलेली नाही, सक्ती केलेली नाही. सगळे आपल्या मर्जीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
हेही वाचा – ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकरांचा संताप; म्हणाले, “आरोपीला फाशी द्या”
शिवसेनेत कुठली जबाबदारी असणार? असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, मला कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही. मी कोणताही शब्द उद्धव ठाकरेंकडून घेतलेला नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पक्षात जात आहे. जी जबाबदारी मला पक्ष देईल ती जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेन, असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. आता उद्धव ठाकरे त्यांना कुठली जबाबदारी देतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.





