मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
![Megablocks on all three railway lines, West, Central and Harbor, tomorrow, Sunday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/meghablock.jpg)
मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज रविवारी, 8 ऑगस्ट 2021 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.सीएसएमटी आणि विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते सायंकाळी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक राहील. अशा स्थितीत, सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.36 पर्यंत सुटणार्या धीम्या सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार असून मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार येथे थांबणार नाहीत. तर घाटकोपरहून सकाळी 10.40 ते सायंकाळी 3.52 पर्यंत सुटणारी अप धीमी सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद हॉल्ट वगळून विद्याविहार आणि सीएसएमटी दरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत प्रभावित राहील. सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 पर्यंत सीएसएमटीहून पनवेल-बेलापूर-वाशीसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 पर्यंत पनवेल-बेलापूर-वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक काळात सीएसएमटी, कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मेन लाईन आणि ट्रान्सहार्बर मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.