ईडीच्या कारवायांवरून भुजबळांचा संताप; थेट PM मोदी आणि शहांकडे हस्तक्षेपाची मागणी
![Bhujbal's anger over ED's actions; Demand for direct intervention from PM Modi and Shah](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Bhujbals.jpg)
मुंबई | सक्तवसुली संचालनालयाने आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय असलेले वकील सतीश उके यांच्या घरावर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘भाजप नेत्यांनी आरोप केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ईडीकडून कारवाई केली जात आहे. ईडीसारख्या संस्थांचा एका पक्षाकडून वापर सुरू असून हा अतिरेक आता थांबला पाहिजे, यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच लक्ष घालायला हवं,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.
‘विरोधी पक्षातील कोणी टीका केली तर लगेच त्याच्यावर धाडी टाकल्या जातात. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न थेट पंतप्रधान मोदी यांच्यासमोर आक्रमकपणे मांडला आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अशा पटोले यांच्या जवळच्या व्यक्तींवर आता धाडी टाकल्या जात आहेत. राज्य सरकारने एखादी नोटीस पाठवली तरी भाजप नेते अत्याचार होत असल्याच्या गोष्टी करतात आणि आम्ही काही बोललो तरी आमच्या मागे ईडीला पाठवतात,’ असा हल्लाबोलही छगन भुजबळ यांनी केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापराबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तपास यंत्रणांचा गैरवापर जनतेच्या लक्षात आहे. सध्या लोक शांत आहेत, मात्र निवडणुकीच्या माध्यमातून जनताच यांना उत्तर देईल, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
‘महाविकास आघाडीत वाद नाही’
महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. याबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, ‘आम्ही सगळे एकत्र आहोत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत,’ असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.