ताज्या घडामोडीमुंबई

सागरी सेतूवरील मेट्रो मार्गिकेविषयी लवकरच निर्णय

मुंबई | मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचे अंतर शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूवरून (मुंबई पारबंदर प्रकल्प) मेट्रोद्वारे काही मिनिटांत पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सागरी सेतूवरून मेट्रो नेण्यासाठी मेट्रो १९ (प्रभादेवी – शिवडी – नवी मुंबई विमानतळ) मार्गिकेची आखणी (एमएमआरडीए) केली आहे. या मार्गिकेचा व्यवहार्यता अभ्यास अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालावर मेट्रो १९ चे भवितव्य ठरणार आहे.

२१.८१ किमीच्या शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूचे काम सध्ये वेगात सुरू असून सप्टेंबर २०२३ मध्ये हा सेतू वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे २०२३ पासून शिवडीवरून नवी मुंबईला केवळ २५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाचा वापर अधिक व्हावा यासाठी त्यावर मेट्रो मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे. सागरी सेतूचे काम सुरू असताना आणि प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असताना प्रस्तावित मेट्रो मार्गाबाबत कोणतीही कार्यवाही एमएमआरडीएकडून होताना दिसत नव्हती. त्यामुळे सागरी सेतूवरील मेट्रो बारगळल्याचे चित्र होते. मात्र, एमएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक अभ्यास-२ नुसार २०२१ ते २०४१ दरम्यानच्या वाहतूक कोंडीचा विचार करून मेट्रोचे जाळे वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो १९ मार्गिकेचीही शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीनुसार एमएमआरडीएने एका खागसी सल्लागार कंपनीची नियुक्ती करुन सागरी सेतूवरील मेट्रो मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. हा अभ्यास आता अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंबंधीचा अहवाल एमएमआरडीएकडे सादर होईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. अहवालावर या मार्गिकेचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र हा अहवाल सकारात्मक येईल आणि हा मार्ग मार्गी लागेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button