मुंबईत दादरमध्ये दहीहंडीमुळे अडकून पडली अँब्युलन्स, गोविंदांचे थरांवर लक्ष तर आयोजकांचीही निष्क्रियता…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Dadar-Ambulance.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडीवरील सर्व निर्बंध हटवल्यानंतर मोठ्या उत्साहात गोविंदा पथकं हे आपले थर लावण्यासाठी दादर इथे आले आहेत. मात्र आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णवाहिका अडकली. दादर पश्चिम येथील आयडियल गल्ली येथील श्री साई दत्त मित्र मंडळाने दहीहंडी आयोजित केली आहे. या मित्रमंडळाच्या दहीहंडीत ही घटना घडली आहे. गोविंदा पथकाचे थर लागून उतरेपर्यंत रुग्णवाहिका एकाच जागी उभी होती. मात्र गोविंदा पथकाने आपले थर काही उतरवले नाहीत. त्याचबरोबर आयोजकांनी देखील या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. यामुळे आयोजकांवर नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबईत १२ गोविंदा जखमी
मुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत १२ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ गोविंदांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या गोविंदाची प्रकृती स्थिर आहे. मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये ५, केईएममध्ये १, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये १, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये १ आणि पोद्दार हॉस्पिटलमध्ये ४ जखमी गोविंदा दाखल झाले होते.