अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आपली व्यथा मांडली
अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांना राज्य सरकारचे घर आणि रोजगाराची व्यवस्था करण्याचे निर्देश
![Akshay Shinde, parents, Mumbai, High Court, Anguish,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/akshay-shinde-780x470.jpg)
मुंबई : बदलापूरमध्ये शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र आता त्याच्या आई-वडिलांना का त्रास सहन करायला लावताय असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना घर द्या आणि रोजगाराची व्यवस्था करा असे निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.
अक्षय शिंदे याच्या आई वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आपली व्यथा मांडली. अक्षय शिंदेला अटक झाल्यापासून आम्हाला त्रास दिला गेला. आम्हाला घर सोडावं लागलं. आता आम्ही बहिष्कृत जीवन जगत असल्याचं आई वडिलांनी न्यायालयात सांगितलं. आई वडिलांची कैफियत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ऐकून घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांना राज्य सरकारने घर आणि रोजगाराची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकार किंवा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अक्षयच्या आई वडिलांना मदत पुरवा असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना त्रास का सहन करायला लावताय असा सवालही हायकोर्टाने विचारला.
बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर होता. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला चौकशीसाठी नेत असताना एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला तळोजा जेलमधून तपासासाठी नेण्यात येत होतं. तेव्हा वाटेत त्यानं गाडीत पोलिसांची बंदूक हिसाकवून गोळीबाराचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला. यात अक्षय गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.