अहमदाबाद ते मुंबई डबल डेकरचा अपघात टळला
![Ahmedabad to Mumbai double decker accident averted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-25.jpg)
गाडी क्रमांक १२९३२ अहमदाबादहून वातानुकूलित डबल डेकर गाडी मुंबईला येत होती.
मुंबई | अहमदाबादहून मुंबईला येणाऱ्या डबल डेकरचा मोठा अपघात शनिवारी सकाळी टळला. डबल डेकरच्या तीन डब्यांना रेल्वे रुळाजवळच असलेल्या एका मालवाहू डंपरची धडक लागली. यात डबल डेकरच्या तीनही डब्यांना डंपर घासून गेला. डंपर पूर्णत: रुळावर आला असता तर मोठा अपघात झाला असता.डबल डेकरमध्ये ५०२ प्रवासी प्रवास करत होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाकडून डंपर चालकाला अटक केली.
गाडी क्रमांक १२९३२ अहमदाबादहून वातानुकूलित डबल डेकर गाडी मुंबईला येत होती. ही गाडी सकाळी ११ च्या सुमारास उमरगाव येथून जात असतानाच रेल्वे रुळाच्या बाजूलाच असलेल्या एका डंपरची किंचतशी धडक डबल डेकरच्या शेवटच्या तीन डब्यांना लागली. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सांजन ते उमरगाव दरम्यान रेल्वे रुळांच्या बाजूलाच मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिकेचे काम सुरू आहे. तेथे खडी घेऊन आलेला मालवाहू डंपरही उभा होता. हा डंपर मागे-पुढे होत असतानाच डबल डेकर गाडीच्या शेवटच्या तीन डब्यांना डंपर घासला गेला.
ही बाब डबल डेकरच्या गार्डला समजताच त्वरित त्याने ब्रेक लावला आणि गाडी चालवणाऱ्या लोको पायलटलाही याची कल्पना देताच त्यानेही गाडी थांबवली.