ताज्या घडामोडीमुंबई

राज्यभरात सर्वत्र जोरदार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कृषिमालाला

पावसाच्या तडाख्याने भाज्या कडाडल्या; आवक घटल्याने बाजारात भाज्या शंभरीपार

नवी मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र जोरदार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कृषिमालाला बसू लागला आहे. अतिवृष्टीमुळे भाज्या पाण्यात अधिक प्रमाणात भिजून त्यांचे नुकसान होत आहे. परिणामी, मुंबईला होणाऱ्या भाज्यांच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असून घाऊक बाजारात होणारी आवक ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यातही जी काही भाजी बाजारात येत आहे, त्यातही भिजलेल्या भाज्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी, आधीच वाढलेल्या भाज्यांच्या दरात आणखी २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात सोमवारी भिजलेल्या भाज्या दाखल झाल्या. शेतात जास्त पाऊस पडल्याने पूर्णपणे भिजलेला शेतमाल मुंबईला येत आहे. त्यातच हा माल गोणीत भरून मुंबई बाजारात येईपर्यंत तो आणखी खराब होत आहे. जास्त पाऊस असला की शेतातून माल काढण्यासाठी मजूरही मिळत नाहीत. पावसात काम करण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळे बाजारात माल पाठवताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याने मुंबई बाजारात कमी प्रमाणात भाज्या येत आहेत. भाज्यांचे प्रमाण कमी आणि मागणी जास्त असल्याने अन् पावसाने माल खराब होण्याचे प्रमाणही वाढले असल्याने बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यात आत्ता अतिवृष्टीमुळे माल खराब होत असल्यानेही भाज्यांच्या दरात आणखी २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर किलोमागे शंभरीपार गेले आहेत.

पावसामुळे भिजलेला कृषिमाल बाजारात येत आहे. हा माल जास्त वेळ टिकत नाही. तो लवकर खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांचे नुकसान होत आहे. परिणामी, भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. येत्या महिनाभर हेच चित्र बाजारात दिसणार आहे.- कैलास ताजणे, घाऊक व्यापारी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

भाज्या घाऊक दर (रुपये प्रति किलो) किरकोळ दर (प्रति किलो)
भेंडी ४० ते ५० ८० ते १००फरसबी ६० ते ८० १०० ते १२०
घेवडा ५० ते ६० ८० ते १००
गवार ६० ते ७० ८० ते १००
सिमला मिरची ५० ते ६० ८० ते ९०
शेवगा ८० ते ९० १०० ते १२०
टोमॅटो ६० ते ७० १०० ते १२०
सुरण ५५ ते ६५ ८० ते १००
तोंडली ६० ते ७० ८० ते १००
मटार ८० ते १०० १२० ते १६०
हिरवी मिरची ६० ते ८० ८० ते १००

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button