८ जानेवारी रोजी कामगार संघटनेचा देशव्यापी संप…संपाला शिवसेनेची साथ…

मुंबई | महाईन्यूज |
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. विशेष म्हणजे डाव्यांच्या या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे. या संपाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली होती.
कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबई पत्रकार संघात संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसोबत शिवसेना नेते संजय राऊतही एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेनंतर आता डाव्या पक्षांसोबत देशव्यापी संपात शिवसेना सहभागी होणार.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोदी सरकार देशातील जनतेला २ कोटी नोकऱ्या देणार होते. मात्र, प्रत्यक्षात ५ कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत करणार होते पण १ लाख ६७ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून ओरबाडले गेले.त्यामुळे ८ जानेवारीला या संपाद्वारे काय नविन मुद्दे उपस्थित होणार हे पाहण महत्वाचं ठरणारं आहे…





