हा अट्टाहास कशासाठी?; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र
![Raj Thackeray MNS is set to contest Navi Mumbai Municipal Corpaoration election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/raj-thakare-Frame-copy-3-1.jpg)
मुंबई | करोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व भवितव्याच्या या प्रश्नात कुठल्याही राजकारणाला थारा देऊ नये,’ अशी विनंतीही राज यांनी केली आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षावरून सध्या राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगानं करावा, असं मत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. तर, राज्यपाल परीक्षा घेण्याबाबत आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनीही परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशीच मागणी केली आहे. ‘करोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीमुळं संपूर्ण देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे. मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता टाळेबंदी किती दिवस राहील हे कोणीच सांगू शकत नाही. टाळेबंदी शिथिल झाली तरी करोना संपला असं होणार नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी,’ असा थेट सवाल राज यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांना केला आहे.