‘सीबीएसई’ दहावी, बारावीच्या परीक्षा ४ मेपासून
![Attend Sadenoula's paper of eleven, there will be thermal screening; Rules for students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/board-exams-1584594992.jpg)
मुंबई – सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये सुरू होते. मात्र यंदा जानेवारी उजाडेपर्यंत वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थी अस्वस्थ होते. परंतु आता अखेर सीबीएसईच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून लेखी परीक्षा ४ मेपासून तर प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षांच्या तारखा गुरुवारी जाहीर केल्या.
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ४ मे २०२१पासून सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालणार आहेत. तर त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होतील. तसेच परीक्षांनंतर १५ जुलैपर्यंत निकालही जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जाहीर करण्यात आल्याचे, रमेश पोखरियाल यांनी सांगितले.
दरम्यान, सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राज्य मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. सध्या राज्य मंडळाचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात परीक्षा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.