संगीत क्षेत्रातला “शुक्र तारा’ निखळला – देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/devendra-fadnavis.jpg)
मुंबई – ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात दाते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाचा साजल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः “भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, “शुक्र तारा मंद वारा’, “स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे, असे म्हटले आहे.
भावसंगीत क्षेत्रात मोठी पोकळी – विनोद तावडे
मराठी संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाने मराठी भावगीतातला शुक्रतारा निखळला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. तावडे शोक संदेशात म्हणतात की, जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ दाते यांनी मराठी संगीतासाठी योगदान दिले. “शुक्र तारा मंद वारा’, “अखेरचे येतील माझ्या’ अशी विविध एकाहून एक सरस गाणी गाणारे आणि जगण्यावर प्रेम करायला लावणारे गायक दाते यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.