शुक्रवारपासून पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार
![Western Railway will run at full capacity from Friday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/local-train-1.jpg)
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांसाठी ठराविक वेळेत लोकल रेल्वे सुरु आहेत. दरम्यान कार्यालये खुली झाल्याने आता सर्वांसाठी लोकल सेवा खुली करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र त्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वे शुक्रवार, २९ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेच्या कोरोना संकटाआधी धावत होत्या तेवढ्याच म्हणजे १३६७ फेऱ्या पुन्हा सुरू होणार आहेत. सध्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करत पश्चिम रेल्वे मार्गावर १२०१ फेऱ्या सुरू आहेत. तर लवकरच पश्चिम रेल्वे प्रमाणे मध्य रेल्वेही पूर्ण क्षमतेने धावणार आहे. सध्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करत मध्य रेल्वे मार्गावर १५८० फेऱ्या सुरू आहेत. कोरोना संकटाआधी मध्य रेल्वे मार्गावर दररोज १७७४ फेऱ्या होत होत्या. महत्त्वाचे म्हणजे फेऱ्या वाढवल्या असल्या तरी राज्य सरकारने ज्यांना प्रवासाची मुभा दिली आहे, तेच प्रवासी या लोकल सेवेचा सध्या लाभ घेऊ शकतील. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी विनाकारण स्टेशनांवर गर्दी करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाचा :-अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान अपघात, एकाचा मृत्यू
कोरोना काळाआधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून दररोज सुमारे ४५ लाख प्रवाशांची ये-जा व्हायची. रेल्वेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर भारतातील इतर कोणत्याही शहरात होत नाही. याच कारणामुळे रेल्वे संदर्भात काय निर्णय होतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
दरम्यान, कोरोना संकट अद्याप संपलेले नाही. याच कारणामुळे पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार असली तरी कोविड प्रोटोकॉल लागू असेल. तीन आसनांच्या बाकावर पहिल्या आणि तिसऱ्या आसनावर बसण्याची आणि दुसऱ्या क्रमाकांचे आसन रिक्त ठेवण्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे. यामुळे फेऱ्यांची संख्या वाढत असली तरी डबे खच्चून भरण्याचे प्रकार कमी झाले आहे. मात्र गर्दीच्या वेळेत काही गाड्या प्रवाशांनी भरल्याचे चित्र दिसते. मास्क आणि सोशल डिस्टंसच्या बंधनांचे उल्लंघन होते. हे प्रकार कमी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.