वृद्ध महिलेच्या पोटात सुमारे पाच किलोग्रॅम वजनाची गाठ

- जे.जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
जे.जे. रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेच्या पोटातून सुमारे पाच किलोग्रॅम वजनाची गाठ यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून काढली आहे. फुटबॉलच्या आकाराची दिसणारी ही गाठ गेले वर्षभर अंडाशयाजवळ वाढत होती. अंडाशयाजवळ इतकी मोठी गाठ प्रथमच आढळून येत असल्याचे जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
दादर येथे वास्तव्यास असणाऱ्या या महिलेचा वास्तुस्थापत्यशास्त्राचा व्यवसाय आहे. गेले वर्षभर पोटाच्या खालच्या बाजूस काही तरी वाढत असल्याचे जाणवत होते; परंतु त्या वेळी विशेष लक्ष दिले नाही. परंतु दिवसेंदिवस पोटाच्या खालच्या बाजूस सूज वाढतच गेली. दुखत नसल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु वर्षभरातच नऊ महिने गरोदर असलेल्या महिलेप्रमाणे पोटाचा आकार वाढला. म्हणून मग मी रुग्णालयात उपचारासाठी आले, असे त्या महिलेने सांगितले.
पोटात दुखत होते म्हणू आलेल्या या रुग्णाच्या चाचण्या केल्या. त्यामध्ये त्यांच्या अंडाशयाजवळ ही गाठ वाढत असल्याचे दिसून आले. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ही गाठ काढली गेली.
सर्वसाधारणपणे दोन किलोग्रॅम वजनाची गाठ आतापर्यंत आढळली आहे. सुमारे पाच किलो वजनाची गाठ प्रथमच आढळली असल्याचा अंदाज आहे, असे जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. मृदुला राघव यांनी सांगितले.
शस्त्रक्रिया करताना ५.२ किलोग्रॅम वजनाची गाठ पाहून आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. तरुण वयात स्त्रियांमध्ये अंडाशयाजवळ गाठी निर्माण होतात; परंतु या बाई ७२ वर्षांच्या असून वयोवृद्ध महिलेच्या अंडाशयाजवळ इतकी मोठी गाठ आढळली आहे.
‘एवढी मोठी गाठ प्रथमच’
सर्वसाधारणपणे दोन किलोग्रॅम वजनाची गाठ आतापर्यंत आढळली आहे. सुमारे पाच किलो वजनाची गाठ प्रथमच आढळली असल्याचा अंदाज आहे, असे जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. मृदुला राघव यांनी सांगितले. सध्या या बाईंची तब्येत ठीक असून ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. ही गाठ पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आली असल्याचेही पुढे डॉ. मृदुला यांनी सांगितले.




