breaking-newsमुंबई

वाहून गेलेला चिमुकला दिव्यांश अद्यापही बेपत्ता

  • दोन दिवसांनंतर शोध मोहीम थांबविली; नागरिकांमध्ये संताप

मुंबई : मालाड येथील आंबेडकर चौक परिसरात गटारात पडून वाहून गेलेला चिमुकला दिव्यांश अद्याप सापडलेला नाही. पालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष आदी पथकाने त्याच्या शोधासाठी राबवलेली मोहीम शुक्रवारी रात्री उशिरा थांबविली. दोन दिवस उलटूनही दिव्यांशचा शोध लावण्यात यश आले नसल्याने नागरिकांकडून यंत्रणांविरोधात संताप व्यक्त होत आहे. तर समाज माध्यमांवर पालिकेच्या निष्काळजीवर टीका व्यक्त होत आहे.

बुधवारी रात्री दिव्यांशचे वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता त्यांच्या मागे दिव्यांशही गेला. वडील रस्त्यावर कुठे दिसले नाहीत म्हणून तो फिरत असतानाच उघडय़ा गटारात पडला. दिव्यांश कुठे न दिसल्याने जवळच असलेल्या मशिदीबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये दिव्यांश गटारात पडल्याचे समजताच पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. या शोधमोहिमेदरम्यान बचाव पथकाने दहा किमी लांबीची ड्रेनेज लाइन तपासली, मात्र त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. गटारापासून जवळच असलेल्या नाल्यांमध्ये तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ड्रोन कॅमेरांचा वापर करण्यात आल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. स्थानिक नागरिकही त्यासाठी मदत करत आहेत.

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत येथील गटारावर झाकण टाकण्यासाठी पाठपुरावा केला होता, असे दिव्यांशच्या पालकांचे म्हणणे आहे. पालिका कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी स्थानिक रहिवासी राहुल ठोके यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रारीची दखल न घेतल्याने दुर्घटना..

दोन वर्षांपूर्वी डॉ. दीपक अमरापूरकर हे भुयारी गटारद्वारात पडून वाहून गेल्यानंतर पालिकेच्या निष्काळजीबाबत प्रचंड टीका झाली. मात्र त्यातून पालिकेने काहीही धडा घेतला नाही. अनेक ठिकाणी उघडी गटारे, झाकणे नसलेली भुयारी गटारद्वारे (मॅनहोल) दिसतात. ज्या गटारात दिव्यांश पडला त्या गटारावर झाकण बसवण्यासाठी पालिकेकडे वेळोवेळी तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप दिव्यांशचे वडील सूरजभान यांनी केला आहे. पालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी  या दुर्घटनेसाठी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पालक हवालदिल..  : गेल्या दोन दिवसांपासून दिव्यांशचे पालक हवालदिल झाले असून शुक्रवारी त्यांनी  आपला मुलगा कुठे सापडल्यास आम्हाला कळवावे, अशा आशयाचे पत्रक वाटले. तर  ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये एकटाच दुडक्या चालीने चालणारा दिव्यांश अचानक गटारात पडल्याच्या चित्रफिती माध्यमांमध्ये पाहून मुंबईकरांचाही जीव हळहळला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button