रोहीत पवारांचा एल्गार, कार्यकर्त्यांना मुंबईत उपस्थित राहण्याचे आवाहन
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध अमंलबजावणी संचलनालय (ईडी) ने राज्य सहकारी बँकेच्या संचालकांविरोधात बँकेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यातील चौकशीला सामोरं जात असताना खुद्द शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. मात्र दुसरीकड़े पवारांचे नातू रोहित पवार यांनी एल्गार पुकारत राज्यातील तमाम कार्यकर्त्यांना मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचं आवाहन केले आहे.
शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी आजोबांवर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना रोहित पवार असं म्हणाले की, ‘पवार साहेबांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, कारवाई करायची असेल तर माझ्यावर करावी, नोटीस पाठवायची असेल तर मला पाठवा. कदाचित याच भाषणाचं प्रत्युत्तर म्हणून पवार साहेबांवर ही कारवाई करण्यात आली आहे.’
पवार साहेबांनी याबाबतीत सांगितले आहे की ते स्वतः या बँकेचे सदस्य नव्हते, संचालक नव्हते. तरी सुध्दा असं सांगण्यात आलं की जे संचालक मंडळ होतं ते पवार साहेबांच्या विचाराने चालणारं होतं आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.’ असं रोहित पवार यावेळी म्हणाले.