राज्यातील सर्व राजकीय आणि शासकीय कार्यक्रमांवर बंदी : राजेश टोपे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Rajesh-Tope-1.jpg)
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतला. यात महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
पुढील काही काळ राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, “चीनमधील वुहानमध्ये आता रुग्ण वाढत नाही, कारण त्यांनी वुहानमधील सार्वजनिकपणे एकत्र येण्यावर निर्बंध लावले आहेत. लोकांना विलगीकरण करुन ठेवण्यात आलं आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. म्हणूनच आम्ही देखील महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम रोखण्याचे आदेश दिले आहेत.
कोणताही राजकीय कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम न घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर त्यावरही लक्ष आहे. आवश्यकता पडल्यास शाळांनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.”