राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
मुंबई | महाराष्ट्रातील श्रीमंत मराठा आमदारांना त्यांच्या समाजासाठी आरक्षण नको आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांनी ट्विट करून यासंदर्भातील आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा. अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग केला होता. मात्र, यावेळी न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.