राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१ वर
![Strict lockdown again in England](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus-e-chernobyl-1.jpg)
मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांनी बुधवारी चार लाखांचा आकडा ओलांडला. बुधवारी ९ हजार २११ नवे रुग्ण तर २९८ मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ४ लाख ६५१ तर बळींची संख्या १४ हजार ४६३ वर गेली आहे. तसेच बुधवारी दिवसभरात ७ हजार ४७८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आता एकूण कोरोनामुक्तांचा आकडा २ लाख ३९ हजार ७५५ झाला आहे. तर राज्यात सध्या १ लाख ४६ हजार १२९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ५९.८४% असून मृत्यूदर ३.६१% इतका आहे.
मुंबईत बुधवारी कोरोनाचे १ हजार ११८ नवे रुग्ण आढळले असून ६० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. तसेच ९१६ जण कोरोनामुक्त झाले. यासह शहरात कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्यांची संख्या ८५ हजार ३२७ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ६ हजार २४४ इतका झाला आहे. तसेच मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून आता २० हजार १२४ इतकी आहे. त्याचबरोबर शहरात आतापर्यंत ५ लाख ५ हजार ९८२ चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ९६४ वर पोहोचली आहे.
पुणे शहरात बुधवारी दिवसभरात नव्याने १ हजार ३०८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील एकूण रुग्णांची संख्या ५१ हजार ७३८ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात आतापर्यंत १ हजार २५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर उपचार घेणार्या २ हजार ५४३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ३२ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १ हजार ७७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ११ जणांचा मृत्यू झाला. यासह पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजारांच्या पार गेली असून १९ हजार ४३१ वर पोहोचली आहे. यापैकी १२ हजार २७८ जण कोरोनामुक्त झाले असून महापालिकेच्या रुग्णालयात ३ हजार १४२ जण सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.