राज्यपालांची वाचाळ बडबड ः राज्यपालांनी छत्रपती शिवरायांची थेट पवार, गडकरींशी केली तुलना; म्हणाले ‘हेच सध्याचे आदर्श’
![Governor's verbal chatter: Governor directly compared Chhatrapati Shivarai with Pawar, Gadkari; Said 'this is the current ideal'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/BhagatSingh-Koshyari.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केली आहे. यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली आहे. ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले विषय आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत, असं विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे.
आज औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.
यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो, तेव्हा आम्हाला शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण? त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र बोस, कोणाला पंडित जवाहरलाल नेहरू, तर कोणाला गांधीजी चांगले वाटायचे. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेव्हरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील, शिवाजी महाराज जुन्या काळातली गोष्ट आहे.. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.
हेच आमचे आयडॉल
कोश्यारी पुढे म्हणाले की, मागच्या वर्षी या दोघांनाही माझ्या हस्ते मानद पदवी देण्यात आली होती. आता पुन्हा या दोघांना माझ्या हस्ते डिलीट दिली गेली . आणखी दोन ते तीन विद्यापीठांची डिलीट यांना देणे बाकी आहे. तेथील कुलगुरुंना मी म्हणतो तुम्हाला दुसरे कोणी सापडत नाहीत का? तर ते म्हणतात हेच आमचे आयडॉल आहेत. यांचे काम चांगले आहेत. त्यामुळे यांनाच डिलीट द्यायची आहे. म्हणून माझाही नाईलाज होतो.
मात्र भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यभरातून निषेध होतोय. महाराजांची तुलना राजकीय नेत्यांशी करणं चुकीचं असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी देखील राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरुनही राज्यात गदारोळ झाला होता. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरही त्यांनी आक्षेपाहार्य विधान केले होते.