म्हाडाच्या घरांमध्ये पोलिसांना मिळणार घर – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/13-5.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
‘म्हाडा’च्या घरांमध्ये पोलिस हवालदार पदावरील कर्मचाऱ्यांसाठी 10 टक्के, तर राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी 10 टक्के अशी एकूण 20 टक्के घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडामध्ये कोणत्याही प्रकल्पाची फाईल ही 45 दिवसांत निकाली काढण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एसआरएच्या कारभारात पूर्णपणे पारदर्शकता आणण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, गृहनिर्माण प्रकल्पांमधील फॉरवर्ड ट्रेडिंग बंद करण्यात येणार आहे. यामुळे एका विकासकाने प्रकल्प घ्यायचा आणि त्याचे तुकडे करून इतरांना विकायचे हा प्रकार बंद होईल. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. म्हाडा कॉर्पस फंड घेऊन स्वतः इमारत बांधण्यात येईल. त्यामुळे म्हाडाला निधी मिळण्यासह सरकारवरील आर्थिक भारही कमी होईल, असे आव्हाड म्हणाले.