मुंबईत सेनेचाच भगवा फडकेल – महापौर किशोरी पेडणेकर
![Announce the name of the minister in Karan Johar's party, otherwise apologize, Mayor challenges Ashish Shelar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/kishori-pedneekar.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर स्वबळावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. आमच्याबरोबर २५ वर्ष महापालिकेत सत्तेची बोरं चाखली तोच पक्ष आमच्यासमोर शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले असे समजा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिले आहे. तर आगामी महापालिकेत सेनेचाच भगवा फडकणार असल्याचा दावा पेडणेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये केला.
मुंबई महापालिका निवडणुकीला अजूनही वर्षभराचा कालावधी आहे. परंतु त्याआधीच भाजप आणि शिवसेनेत लढाई सुरु झाली आहे. या निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे उद्धिष्ट भाजपने ठेवले आहे. यासाठी भाजपने मिशन मुंबई सुरु केले असून आतापासूनच निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडकून टीका केली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका करत भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या शिक्षकानं आणि पदवीधर निवडणुकीत जनतेने हे दाखवून दिल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेला अजून वर्षभराचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे वर्षभराने महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने भगवा फडकण्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.