Breaking-newsमुंबई
मुंबईत खिडकीची झडप अंगावर पडून पादचाऱ्याचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/south-mumbai.jpg)
दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागात खिडकीची झडप अंगावर पडून एका ३२ वर्षीय इन्शूरन्स एजंटचा मृत्यू झाला. सुनील हरीशचंद्र गावकर असे मृताचे नाव आहे. सुनील दरबारशॉ इमारतीच्या खालून चालले असताना अचानक पाचव्या मजल्यावरुन खिडकीचा भाग निखळून त्यांच्या अंगावर पडला. गंभीर जखमी झालेल्या सुनील यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रात्री उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोरेगाव येथे राहणारे सुनील गावकर नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी इन्शूरन्सचे चेक गोळा करण्यासाठी आले होते. ते दरबारशॉ इमारतीच्या खालून चालले होते. त्यावेळी ही घटना घडली. सुनील गावकर एशियाटीक लायब्ररीजवळ बसमधून उतरले व बॅलार्ड इस्टेटच्या दिशेने येत होते. त्यावेळी निखळलेली खिडकीची झडप त्यांच्या अंगावर पडली.
दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर इमारतीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना कळवले. पोलीस सुनील गावकर यांना जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात घेऊन गेले पण काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दरबारशॉ इमारतीच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारण त्याच्याकडे इमारतीच्या देखभालीची जबाबदारी होती.