breaking-newsमुंबई

मुंबईतील हा टेम्पो चालक घेतोय भटक्या कुत्र्या-मांजरांची काळजी

ठाण्यामध्ये एका व्यक्तीने शेजारच्यांची मांजर त्रास देते म्हणून तिला थेट १६ व्या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना समोर आली. या घटनेबद्दल प्राणीप्रेमी संघना तसेच नेटकऱ्यांनीही चांगलाच संताप व्यक्त केला आहे. एकीकडे प्राण्यांबद्दल इतका द्वेष करणारे लोक असताना मुंबईत मात्र एक टेम्पो चालक चक्क रस्त्यावरील २० मांजरी आणि २ कुत्र्यांची काळजी घेताना दिसत आहे.

स्वत: एका छोट्याश्या घरात राहणाऱ्या या प्राणीप्रेमी व्यक्तीचे नाव आहे बी. राजेंद्र उर्फ राजन. राजन हे मुंबईमधील काळा घोडा येथील एका फुटपाथवरील झोपडीवजा घरात राहतात. त्यांनी आपल्या घरात २० मांजरी आणि दोन कुत्र्यांना जणू दत्तकच घेतले आहे. ते रोज या सर्व प्राण्यांच्या खाण्याची आणि झोपायला सुरक्षित जागा देत त्यांची काळजी घेतात. त्यांनी सर्व मांजरींना ‘काळू’ असे एकच नाव दिले आहे. ‘मी या सर्व मांजरींना कालू या एकाच नावाने हाक मारतो. जसं काही ते त्याचं अडनाव आहे. यामागील कारण म्हणजे सर्व मांजरींना वेगवेगळी नावे ठेवली तर त्यांचा गोंधळ होईल आणि कोणीच मला प्रतिसाद देणार नाही. आता यापैकी अनेक मांजरी मला ओळखू लागल्या आहेत. तर मांजरींची पिल्ल माझ्याकडे काहीतरी खायला मिळेल या अपेक्षेने येतात’, असं राजन यांनी ‘डीएनए’शी बोलताना सांगितले.

मूळचे तामिळनाडूमधील तिरुनवेल्लीमधील असलेले राजन हे २० वर्षांपूर्वी मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आले. तेव्हापासून ते काळाघोडा येथील फुटपाथवर झोपडीवजा घरात राहू लागले. राजन हे टेम्पो चालक म्हणून काम करतात. त्यानंतर घरी येताना ते जवळच्या हॉटेलमधील उरलेले अन्न या मांजरींसाठी घेऊन येतात. रोज बरोबर दहा वाजता ते आपल्या घरातील दारात उभे राहून ‘काळू’ असा आवाज देऊन जणू या मांजरींना रात्रीच्या जेवणासाठी बोलवतात. राजन यांनी आवाज दिल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये एकएक करुन सर्व मांजरी त्यांच्यासमोर येतात. या मांजरींची काळजी घेताना राजन यांना त्यांचे शेजारीही मदत करतात. ‘माझ्या आजूबाजूला राहणारे लोकही खूप चांगले आहेत. त्यांनाही या मांजरींचा लळा लागलेला आहे. त्यामुळे उरलेलं अन्न फेकून देण्याऐवजी ते या मांजरींना खायला देतात. कधी मी घरी नसेल तर मांजरी उपाशी राहणार नाही याची काळजी माझे शेजारी घेतात’ असं राजन अभिमानाने सांगतात.

या इतक्या मांजरींची तुम्ही का काळजी घेता असं विचारलं असता खरं म्हणजे या सर्व मांजरी एकाच मांजरीपासून झालेल्या असल्याचं राजन सांगतात. अनेक वर्षांपूर्वी मी येथे आलो तेव्हा मला येथे फुटपाथवर एक मांजर सापडली. मी तिला खाऊ पिऊ घातलं आणि मग ती माझ्याच घरी राहू लागली. ती अनेक वर्षे माझ्या घरी होती. जेव्हा तिला पिल्लं झाली तेव्हा ती पिल्लंही येथेच राहू लागली, असं ५० वर्षीय राजन सांगतात. या मांजरांना झालेल्या अनेक पिल्लांपैकी काही बोके मोठे झाल्यानंतर मारामारी करुन निघून जातात. मात्र मांजरी कधीच घर सोडून गेल्या नसल्याची माहिती राजन यांनी दिली.

या २० मांजरींबरोबरच राजन यांच्याकडे दोन कुत्रेही आहेत. यापैकी एक कुत्रा २० वर्षांहून अधिक वयाचा आहे. काही दिवसांपूर्वीच तो आजारी पडल्याने त्याला प्राणीमित्रांच्या हवाली केले असून तेथे त्याची काळजी घेतली जात असल्याचे राजन म्हणाले. तर दुसऱ्या कुत्र्याचे वयही २०च्या आसपासच असून त्याचे नावही राजन यांनी ‘काळू’च ठेवले आहे.

स्वत: गरिबीमध्ये राहूनही प्राण्यांसाठी इतके कष्ट का घेता?, असा प्रश्न विचारला असता राजन यांनी केवळ मला प्राणी आवडतात म्हणून मी हे करतो असं सांगितलं. लहानपणापासून मला प्राण्यांचा लळा आहे. ते अगदी थोडा काळात तुमचे चांगले साथीदार होतात. आता या मांजरींच उदाहरण घ्या ना. मी एकटा असतो तर या मला सोबत करतात. माझ्या पायाजवळ सतत फिरत असतात. अगदी मी झोपायला गेलो तरी माझ्या आजूबाजूला येऊन झोपतात. कधीकधी मला अगदी टेम्पोमध्ये झोपावं लागलं तरी तिथेही त्या मला सोबत करतात. मला त्यांची सोबत खूप आवडते असं राजन आपल्या मांजरींबद्दल बोलताना सांगतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button