मुंबईतील चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण, खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ecocorona_505_270320074935.jpg)
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होम क्वारंटाईमधील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
मुंबईत आज (31 मार्च) कोरोनाचे नव्या 59 रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी 47 रुग्ण सापडले. या रुग्णांमध्ये 6 एप्रिलपर्यंत अशाचप्रकारे वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे झोपडपट्ट्या आणि चाळींमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या 147 वस्त्या, गृहसंकुले महापालिकेने सील केली आहेत. त्यात वरळी कोळीवाडा, गोरेगाव येथील बिंबिसार नगर अशा मोठ्या वसाहतींचाही समावेश आहे.
कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाही सक्तीने 14 दिवस एकांतात राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र घरे लहान असलेल्या व्यक्तींना एकांतात राहणे शक्य नसते. अशा व्यक्तींच्या होम क्वारंटाईनसाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेतली जाणार आहे. नुकतंच महापालिका आयुक्त परदेशी यांनी याबाबतचे आदेश प्रभागातील सहायक आयुक्तांना दिले. त्यांना प्राथमिक सोईसुविधा पुरवण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.