माण-खटावमध्ये काॅंग्रेसची ताकद वाढणार; रणजितसिंह देशमुख स्वगृही परतणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/1ranjitsingh.jpg)
मुंबई – माण-खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख थोड्याच वेळात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीस दयानंद चोरघे यांनी भाजपला रामराम करत आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाणे जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दयानंद चोरघे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसची ताकद वाढणार
जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचं नुकसान झालं होतं. आता रणजितसिंह हे स्वगृही परतल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
कोण आहेत रणजितसिंह देशमुख?
रणजितसिंह देशमुख हे आधी काँग्रेसमध्येच होते. मात्र, 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकास कामे करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळुमुळे घट्ट केली. 2003 च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.