मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी
मुंबई: मुंबईमध्ये माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 आरोपींना आज (15 सप्टेंबर) पुन्हा न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री समता नगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हांमध्येच कलम 452 ची भर घालत आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली. आज सकाळी त्यांना बोरिवली येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते त्यावेळेस न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टुन सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप द्वारा शेअर करण्यात आल्याच्या रागात कमलेश कदम आणि 5 अन्य शिवसैनिकांनी मदन शर्मा या माजी नौदल अधिकार्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान 12 सप्टेंबरला याप्रकरणी सहा जणांना अटक देखील झालेली आहे. नंतर लगेजच जामीनावर त्यांची सुटका झालेली होती. परंतू त्यानंतर काही भाजपा नेत्यांनी मुंबईत आंदोलनं करत अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलिसांना केलेले होते.
आज राजभवनावर जाऊन स्वतः मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळेस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राजभवनातून बाहेर पडल्यानंतर राज्यपालांनी कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याचेही नमूद केले आहे अशी माहिती असल्याचं मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील माजी नौदल अधिकार्यावरील हल्ल्याचा निषेध केलेला आहे.