मंत्रीपद न मिळाल्याने नव्हे, तर मी सरकारच्या कामावर नाराज
आटपाडी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
मंत्रीपद न मिळाल्याने नव्हे, तर मी सरकारच्या कामावर नाराज आहे. त्यामुळे मी आता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपदसुद्धा घेणार नाही. अशी भूमिका आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केली. विटा येथे बाबर समर्थकांच्या मेळाव्यात आमदार बाबर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून, घेत संयम राखण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती. मात्र, त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आमदार बाबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर अनिल बाबर राजीनामा देणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर अनिल बाबर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
मी शिवसेनेसोबतच राहीन आणि 5 वर्षात माझ्या मतदारसंघात खूप कामे मला करता येतील, असेही बाबर म्हणाले. आपण पक्षाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. त्याचबरोबर बाबर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिपद आणि खातेवाटपाच्या सुरू असलेल्या घोळाचा पार्श्वभूमीवर सरकारला घरचा आहेर दिला. नाराजी आणि माझा संघर्ष राजकारणात कायम असेल. पण संघर्ष आणि नाराजी ही विकास कामासाठी असेल. माझ्या मतदारसंघात एखादे काम मला अपेक्षित आहे ते झालं नाही तर मी निश्चितपणे नाराज होईल. तसेच संघर्ष करेन पण तोही विकासकामांसाठी असेल.