Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bhivandi.jpg)
भिवंडी – मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही इमारत दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून याठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या भागात असलेली ‘जिलानी’ ही इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. आज पहाटे ३.४०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पहाटेच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.