भाजपातील नाराजांची एकजूट ! तावडेंनंतर खडसे-पंकजा मुंडे भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/khadse-tawade-munde-Frame-copy-1.jpg)
महाईन्यूज | मुंबई
पक्षांतराबाबत अफवा पसरवण्यात येत असल्याबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी यानिमित्ताने पक्षातील नाराजांची एकजूट होत असल्याचे चित्र आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पंकजा मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर खडसेंनी कुरघोडीच्या राजकारणाकडे लक्ष वेधल्याने पक्षांतर्गत कलह अधोरेखित झाला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पराभवामागील कारणे आणि पुढील दिशेबाबत चर्चा करू, असे पंकजा मुंडे यांनी समाजमाध्यमांतील संदेशात म्हटले होते. त्यावरून पंकजा मुंडे भाजप सोडणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. मुंडे यांच्या रूपाने इतर मागासवर्गातील एक प्रमुख नेत्या अस्वस्थ असतील तर पक्षातील जुन्यांनी लक्ष दिले नाही, असा संदेश जाऊ नये यासाठी मंगळवारी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर पक्ष सोडण्याची चर्चा पंकजा यांनी फेटाळून लावली आहे.