बसमधील प्रवाशांची काळजी अनिल परब घेणार का? मनसेचा सवाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Sandeep-Deshpande-mns.jpg)
मुंबई – ओसंडून वाहणाऱ्या बसमधील गर्दी पाहता लवकरात लवकर लोकल सुरू करण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती. त्यावेळी लोकल प्रवाशांची जबाबदारी मनसे घेणार का? असा प्रश्न परिवहनमंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता, मनसेने परिवहन मंत्री अनिल परब यांना प्रतिप्रश्न केला असून ‘अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली आहे. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
एसटी बसेसला परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पूर्ण क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. हे करताना बसमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीला बसेसचं निर्जंतुकीकरण केलं जात आहे. प्रवाशांसाठी देखील बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक प्रवाशाने हात सॅनिटाईझ केल्यावरच बसमध्ये प्रवेश करायचा आहे. सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेऊन आम्ही पूर्ण क्षमतेने बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे अनिल परब यांनी सांगितलं होतं.