‘पंतप्रधान मोदी निर्मनुष्य बोगद्यात कोणाला हात दाखवत होते, त्यांची तब्येत बिघडलेय का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Narendra-Modi-in-atal-tunnel.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याचे लोकार्पण केले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत घडलेला एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गाडीतून या बोगद्याचा फेरफटका मारत असताना हा प्रकार घडला होता. यावेळी नरेंद्र मोदी बहुधा उद्घाटनाच्या कार्यक्रमातील त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हात उंचावून दाखवत होते.
मात्र, अटल बोगद्याच्या उद्घाटनावेळी याठिकाणी सामान्य नागरिक किंवा कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे समोर कोणताही जनसमुदाय नसताना पंतप्रधान मोदी नेमका कोणाला हात उंचावून दाखवत होते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
याच मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, निर्मनुष्य बोगद्यात पंतप्रधान कोणाला हात उंचावून दाखवत होते? त्याठिकाणी जनता उपस्थित नव्हती. देशाला विध्वंसाच्या वाटेवर नेणाऱ्या आत्ममग्न पंतप्रधानांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम तर झालेला नाही ना? देशाला पंतप्रधानांच्या प्रकृतीविषयीची माहिती कळाली पाहिजे. यापूर्वीही ‘आदरणीय’ (मोदी) यांच्याबाबत असे किस्से घडले आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांग येथील अटल बोगद्याचे (Atal Tunnel) उद्घाटन केले होते. हिमालयाच्या दुर्गम पर्वरांगांमधील डोंगर खोदून हा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी 474 किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. अटल बोगद्यामुळे हे अंतर 428 किलोमीटर इतके झाले आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) तयार केला आहे.