पंकज-उद्धव भेटीने चर्चांना उधाण…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/udhav-t.jpg)
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील अद्याप समजू शकला नसला तरी राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पंकज भुजबळ यांनी आज मातोश्रीवर सुमारे 15 मिनीटे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असेल तरी नेमके काय कारण असावे याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची बाजूही मांडली होती. यानंतर लगेचच पंकज यांनी ही भेट घेतल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहे.
दरम्यान, छगन भुजबळ राष्ट्रवादीत येण्याआधी शिवसेनेत होते. मात्र, नंतर त्यांनी शिवसेनेची साथ सोडली. यानंतर शिवसेना आणि छगन भुजबळ यांच्यात नेहमी तणावाचे संबंध राहिले. त्यातच उद्धव ठाकरे यांनी भुजबळ शिवसेनेत असते तर अशाप्रकारे तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती असे सूचक विधान केले होते.