breaking-newsमुंबई

दूधभेसळीत वाढ

  • वर्षभरात सात ठिकाणी गुन्हे उघडकीस; दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळून विक्री

शहरात वितरणाच्या पातळीवर दूधभेसळ अधिक प्रमाणात होत असून एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत सात ठिकाणी दूधभेसळीची प्रकरणे उघडकीस आणली असून, त्यातून सुमारे सतराशे लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

भेसळयुक्त दुधामुळे अनेक गंभीर आजार बळावत असल्याने दूधभेसळ अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. वर्षभरातील दूधभेसळीच्या घटना पाहता गंभीर शिक्षेची गरज अधोरेखित होते. नामांकित ब्रॅण्डच्या पिशव्या कापून त्यातील दूध काढून पाणी मिसळण्याचे प्रकार झोपडपट्टी भागांमध्ये घडत आहेत. २०१८मध्ये शहरात सात ठिकाणी अशारीतीने भेसळ करणाऱ्या टोळ्यांवर प्रशासनाने छापे घातले. यात अंधेरी, खारदांडा, भांडूप, खार, सांताक्रूझ या भागांचा प्रामुख्याने समावेश आहे. अमूल, महानंद, गोकुळ अशा नामांकित कंपन्यांच्या दुधात ही भेसळ केली जात होती. छाप्यांमधून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे आणि २१ जणांना अटक झाली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

दुधाचे ६३ नमुने तपासणीसाठी पाठविले गेले होते. त्यापैकी ११ नमुने प्रमाणित होते आणि १८ नमुन्यांमध्ये भेसळ आढळली. ३४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त मंगेश माने यांनी दिली.

२०१७ मध्ये शहरात पाच ठिकाणांहून भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले होते. त्यावेळी दुधाचे २०७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील १७१ नमुने प्रमाणित होते, तर ३५ नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचे निष्पन्न झाले होते. शहरात मुख्यत्वेकरून दुधामध्ये पाण्याची भेसळ केली जात आहे. अन्य प्रकारच्या भेसळीचे प्रकार अद्याप तरी आढळलेले नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विविध कायद्यांनुसार शिक्षेत बदल

भारतीय दंड संहितेच्या अधिनियम ४५मधील कलम २७२ ते २७६ अन्वये खाद्यपदार्थ, पेय, औषधे आणि औषधांसाठी लागणारे पदार्थ यामध्ये भेसळीसाठी सहा महिने कारावास आणि एक हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद होती. याशिवाय अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६च्या कलम ३६ अन्वये याच गुन्ह्य़ासाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद आहे. औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधने अधिनियमात मात्र याच गुन्ह्य़ासाठी १० वर्षे ते आजन्म कारावासासारख्या कडक शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या सर्व प्रकारच्या कायद्यांत अन्न आणि औषधांच्या भेसळीच्या गुन्ह्य़ांसाठी एकाच स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता या गुन्ह्य़ासाठी आजीवन कारावास आणि दंडाची तरतूद असलेली सुधारणा करण्यात आली आहे.

दूधभेसळीमुळे विकार

स्तनवाढीत अडचणी, हृदयरोग, किडनीच्या समस्या, स्मृतिभ्रंश, नजरेवर परिणाम, त्वचारोग, कर्करोग, पोटाचे विकार.

अन्न व औषध प्रशासन हतबल

मुंबई शहरासाठी अन्न विभागासाठी ३५ कर्मचारी नियुक्त आहेत. तक्रार प्राप्त झाली किंवा गोपनीय माहिती मिळाली की, तिथे छापे घालून दूधभेसळ पकडली जाते. परंतु भेसळ पूर्णपणे रोखण्यासाठी एवढे कर्मचारी पुरेसे नसल्याने प्रत्येक विभागामध्ये नजर ठेवणे अशक्य असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

भेसळ कशी ओळखावी?

दूध पिशवी कंपनीतून येते तेव्हा पिशवीच्या बंद केलेल्या बाजूला झिगझॅग आकाराची किनार दिसते. भेसळ करताना पिशव्या कापून त्या बंद करताना बहुतेक वेळा मेणबत्तीवर चिकटविल्या जातात. त्यामुळे पिशवीच्या कोपऱ्यांमध्ये झिगझॅग आकार नसून सपाट पॅकिंग दिसते. तसे दिसल्यास पिशवी कापून पुन्हा बंद केली असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे दुधाची पिशवी वापरण्यापूर्वी पॅकिंग नीट तपासून पाहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button