‘ती’ शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हे – संजय राऊत
![‘She’ is not a hug between Shivaji Maharaj and Afzal Khan - Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Sanjay-Raut.jpg)
मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा साखरपूडा रविवारी पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी साखरपूडा पार पडला. या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र सर्वाधिक चर्चा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीची झाली.
राऊत यांच्या या घरातील कार्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीची विशेष चर्चा रंगली.या गळाभेटीविषयी संजय राऊत यांना विचारले असता, ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती, अशी मजेशीर टिप्पणी केली.राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? मी फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असेही ते म्हणाले.