छत्रपतींचा आणि सावरकरांचा अपमान कधीच सहन केला जाणार नाही- फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Devendra-Fadanvis.jpg)
मुंबई | महाईन्यूज
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि काँग्रेस मुखपत्र शिदोरी यात स्वातंत्र्यवीर यावरकरांवर लिहीण्यात आलेल्या लेखावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडलेलं आहे. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केलेली आहे.
मध्यप्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आलेला आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपतींचा अपमान भारत कधीच सहन करणार नाही. मध्यप्रदेश सरकारने माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभारावा. काँग्रेसची राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरुच आहे. शिवरायांचा पुतळा तोडला, सावरकरांना अपमानित केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र शिदोरीमध्ये सावरकरांवर लेख लिहिला. सावरकरांवर बलात्कारासारखे आरोप केले आहेत. स्वातंत्रवीर नव्हे तर माफीवीर अशाप्रकारच्या लांच्छनास्पद लिखाण केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमी लोकांमध्ये संताप आहे.”