गवार 60, तर टोमॅटो 35 रुपये प्रतिकिलो, APMC मार्केटमध्ये भाज्या कडाडल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/vegatble.jpg)
नवी मुंबई | राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमाल खराब झाल्याने त्याची आवक घटली आहे. नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये आज केवळ 100 ते 120 गाड्या दाखल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज सरासरी 250 ते 300 भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक असते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भाज्यांच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी दुसरीकडे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येक भाजीचे दर हे 10 ते 20 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. तसेच पालेभाज्यासुद्धा महागल्या आहेत.
सध्या नवी मुंबईत टोमॅटोचे दर हे 35 ते 40 रुपये किलो असून किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री 50 ते 60 रुपये प्रतिकिलो सुरु आहे. तर शेवगा 60 ते 70 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. आधी लॉकडाऊन आणि आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे.
- गवार – 60 ते 65 रुपये
- भेंडी – 30 ते 35 रुपये
- शेवगा – 65 ते 70 रुपये
- कारले – 35 ते 40 रुपये
- टोमॅटो – 35 रुपये
- वांगी – 25 ते 30 रुपये
- काकडी – 25 रुपये
- कोबी – 30 ते 35 रुपये
- कोथिंबीर – 10 ते 15 रुपये