गणेशोत्सवासाठी एसटीच्या २,२०० जादा गाडय़ा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/ST-Bus-1-2.jpg)
- आजपासून एसटीचे समूह आरक्षण
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटी महामंडळाने यंदा मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतून २,२०० जादा बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे २७ जुलैपासून आरक्षण सुरू होईल. एसटीचे ग्रुप बुकिंग आरक्षण मात्र २० जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी २ हजार १३४ बसगाडय़ा सोडल्या होत्या.
२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्यातील जादा वाहतूक करण्यात येईल. या वर्षीपासून परतीच्या प्रवासाचेदेखील आरक्षण एकाच वेळी म्हणजे २७ जुलैपासूनच करता येणार आहे.
अनेक जण गटागटानेही (ग्रुप बुकिंग) कोकणात जातात. त्यासाठीही एसटी आरक्षित केली जाते. त्यामुळे गावातील घरापर्यंत जाण्यासाठी गटागटासाठी एसटीचे आरक्षण मोठय़ा प्रमाणात होते. या वेळी २० जुलैपासून ग्रुप बुकिंगला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर विभागांतून एसटीच्या जादा बसगाडय़ा सुटतील. यात सर्वाधिक बसगाडय़ा मुंबईतून सुटणार असून मुंबई सेन्ट्रल, कुर्ला, परळ याव्यतिरिक्त १४ ठिकाणाहून जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठीही ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात येतील. याशिवाय प्रवास मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहेही उभारण्यात येणार आहेत.