गणेशमूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्यास बंदी असल्याचं वृत्त मुंबई पालिकेनं फेटाळलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/iStock-467640893.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याचं आवाहन मुंबई पालिकेनं केलं आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास पालिकेनं बंदी घालण्यात आल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. मात्र, पालिकेनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे. गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आलेली नसल्याचं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. ‘कोविड १९’ च्या अनुषंगाने नागरिकांच्या सेवेसाठी पालिकेतर्फे मुंबई महानगर क्षेत्रात १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले असून सोशल डिस्टनसिंग राखून कृत्रिम तलावात अधिक प्रमाणात गणेशामूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहनही करण्यात येत आहे.
समुद्र किनार्यालगतच्या एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्यास हरकत नाही. पण इतर भाविकांना म्हणजेच जे समुद्रालगत वास्तव्यास नाहीत अशा नागरिकांनी प्राधान्याने घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे; अशी सूचना महापालिका प्रशासनानं केली आहे.
गणेश भक्तांच्या सुविधेसाठी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अधिक संख्येने कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. ज्यानुसार आजपर्यंत १६७ कृत्रिम तलाव तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरीही समुद्रात विसर्जन करण्यावर महापालिकेने बंदी घातलेली नाही, हे पुन्हा एकदा नमूद करण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटायझर वापरुन हा उत्सव पार पाडावा, असे आवाहन पालिकेने वेळोवेळी केलं आहे.